जळगाव – शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याच्या कामासाठी मनपा फंडातून कामे करण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून मक्तेदार पुढे येत नसल्याने महापौर आणि आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर मक्तेदार कामे करण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच एलईडी आणि अमृतच्या कामासाठी खोदलेल्या चाऱ्या बुजविण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
शुक्रवारी महापौर सौ.भारती सोनवणे, आ. राजुमामा भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी, सुनील महाजन, ऍड.मुजुमदार, उपायुक्त संतोष वाहुळे, अभियंता अरविंद भोसले, प्रकाश पाटील, योगेश बोरोले आदी उपस्थित होते.
महापौर सौ.भारती सोनवणे, आ.सुरेश भोळे यांनी शहरातील सर्व कामांचा आढावा घेतला. त्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांचे इस्टीमेट तयार करून ठेवा, ज्याठिकाणी नाल्याचे पाणी घरात घुसते तेथे दुरुस्तीकामी नाल्यांच्या भिंती उंच करण्याचे प्रस्ताव तयार करा, लहान गल्लीत ६ मीटर काँक्रीटचे रस्ते तयार करा अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी केंद्राकडून निधी मिळवू असे आ.सुरेश भोळे यांनी सांगितले.
शहरात अमृत योजनेच्या कामासाठी गल्लोगल्ली चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. पावसाळा संपला असून अमृतच्या चाऱ्या बुजविण्यास मक्तेदाराला सूचना कराव्या. शहरातील ज्या वाढीव वस्तीचा अमृत योजनेत समावेश केलेला नाही त्यासाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर पाठवावा, असे महापौरांनी सांगितले. तसेच अमृत योजनेच्या कामाची एखाद्या परिसरात चाचणी घेण्याचे नियोजन करण्याचे विशाल त्रिपाठी यांनी सुचविले.
जळगाव शहरात खड्डे बुजविण्यासाठी मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागासाठी ५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. परंतु काही प्रभागात कामे करण्यास मक्तेदार तयार नसल्याने अडचण येत होती. निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून महापौर, आयुक्त यांनी नेहमी मक्ते घेणाऱ्या मक्तेदारांना बोलावून आवाहन केले. महापौर, आयुक्त यांच्या विनंतीला मान देत जवळपास सर्वच प्रभागाच्या निविदा भरण्यात आल्या आहेत. तसेच जे कामे करण्यास टाळाटाळ करीत आहे त्यांना महापौर आणि आयुक्त तंबी देणार आहे.