जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर अत्यंत चांगल्या प्रकारे सुशोभित झाला असून शिस्त आणि नियोजन उत्तम दिसून येत आहे, असे मत गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोना प्रतिबंधासाठी कोविशील्ड लस घेण्यासाठी डॉ. उल्हास पाटील हे त्यांच्या मातोश्री गोदावरीआजी, पत्नी व गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील, रुग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांच्यासह आले होते. त्यांनी महाविद्यालय व रुग्णालय आवारात भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अधिष्ठाता दालन, निर्जंतुकीकरण मशीन तसेच रुग्णालय आवारातील परिसरात झालेली रंगरंगोटी आणि भित्तिचित्रांमधील रंगसंगती पाहून पाहून प्रशंसा केली. चित्रांमधील बोलकेपणा आणि मेहनत पाहिल्यानंतर त्यांनी कलाकार प्राचार्य डॉ. अविनाश काटे व टीमसह अधिष्ठाता डॉ. रामानंद आणि प्रशासनाचे कौतुक केले.
यानंतर अधिष्ठाता दालनात येऊन डॉ. पाटील यांनी सहपरिवार चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी, रुग्णालय व महाविद्यालयातील नियोजनाची माहिती दिली. तसेच, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे रुग्णालयातील सर्व विभाग व परिसर दाखविला. आपण दिलेल्या भेटीमुळे आमचे मनोबल निश्चितच वाढणार आहे, असे यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले.


