जळगाव दि. १५– आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमांजोरो शिखरावर येत्या २६ जानेवारीला तिरंगा फडकविण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या पथकात निवड झालेल्या बालाघाट येथील अनिल वसावे (ता. अक्कलकुवा) यांच्या स्वप्नांना जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या रुपाने अशोक जैन यांचा मदतीचा हात मिळाला.
काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर अनिल वसावेची बातमी झळकली होती. तेंव्हाच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले. आर्थिक सहकार्यासोबत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक अशी काही साधन-सामुग्री देखील उपलब्ध करून दिली आहे.
३६० एक्सप्लोअरच्या वतीने दि. २० ते २६ जानेवारी या काळात ‘किलोमांजारो’ सर करण्यात येणार आहे. एव्हरेस्ट वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या चढाईसाठी विविध स्पर्धांमधून भारतातील दहा गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. या गटामध्ये अनिल वसावेंची निवड झाली आहे. अनिल वसावे अतिदुर्गम भागातील बालाघाट, ता. अक्कलकुवा येथील रहिवासी. त्याच्या गावापर्यंत वाहन जात नाही. बालाघाटहून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर तो राहत असलेल्या देवबारीपाडा ही वस्ती येते. या वस्तीजवळच सातपुड्याचा मोठा डोंगर आहे. या डोंगरावर चढ-उताराच्या सवयीतून त्याला गिर्यारोहणाचे वेड लागले. आणि त्यातूनच त्याने आतापर्यंत महाराष्ट्रातील कळसूबाई, अजिंक्यतारा, गटेश्वर, हरिश्चंद्र गड आणि सातपुड्यातील अस्तंबा तसेच चेन्नई येथील शिखर सर केले आहे. त्याची गुणवत्ता हेरुन आंतरराष्ट्रीय कोच आनंद बनसोडे यांनी त्याची किलीमांजरोसाठी निवड केली आहे. दक्षिण अफ्रिकेतील किलीमांजरोचे शिखर सर करण्याची सुरुवात २२ जानेवारीला भारतीय पथक मोशीपासून करणार आहे. २६ जानेवारीला शिखर गाठतील. अनिल विसावे हा आदिवासी समाजातील कदाचित पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ठरणार आहे.
अशोकभाऊंच्या दातृत्वामुळे किलोमांजारो मोहीम शक्य – अनिल वसावे
किलोमांजारो सारख्या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर करण्याची संधी माझ्याकडे चालून आली. घरातील दारिद्र्याची परिस्थिती त्यामुळे मी स्वतः खर्च करून किलोमांजारो येथे जाऊ शकत नाही. ही संधी हातची निसटते किंवा हे स्वप्न भंग होते की काय असे मनातून वाटत होते, असे वाटत असतानाच एका वृत्तपत्रातील बातमी वाचल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला. फक्त आर्थिक पाठबळच नव्हे तर या मोहिमेसाठी लागत असणाऱ्या अनेक बाबींची पूर्तता देखील अशोक जैन यांनी पुरविण्याबाबत सांगितले. अशोकभाऊंसारख्या दातृत्ववान व्यक्तींमुळे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. आदिवासी समाजातील पहिला गिर्यारोहक ठरणाऱ्या अनिल वसावे यांनी ज्यांच्यामुळे त्याचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे त्याबद्दलकृतज्ञता ही व्यक्त केली.
जैन स्पोर्टस् अकॅडमीतर्फे हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत – अशोक जैन
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व जैन परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी मानून उत्तम उदात्त जे आहे त्याला सहकार्य करण्यात येते. जैन स्पोर्टस् अकॅडमी तर्फे क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्य केले जात आहे. जैन अकॅडमीतर्फे चमकदार कामगिरी करणाऱ्या अशा हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी आवर्जून मदत दिली जाते. जागतिक पातळीवर विक्रम नोंदवू पाहणारे गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांची मोहीम यशस्वी होवो या शुभेच्छा ही आमच्यावतीने देत आहे, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.