जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्वचारोग विभागात एका महिन्यात सुमारे ७५० रुग्णांनी नियमित तपासणी केली असून विविध त्वचाविकारावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन रुग्णांना लाभले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १७ डिसेबरपासून कोरोना व्यतिरिक्त असणाऱ्या व्याधींवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय खुले झाले. ओपीडी कक्ष क्र. ३०२ मध्ये त्वचाविकार विभागात आतापर्यंत सुमारे ७५० रुग्णांनी लाभ घेऊन उपचार घेतले आहे. यात त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग, इसब, जुने त्वचेचे आजार, सोरायसिस, केस गळणे, नखांचे आजार, खाज, गजकर्ण, पिंपल्स, सौंदर्यचिकित्सा, नखांचे आजार, कोड, मस काढणे, नागीन अशा आजारांवर उपचार केले जात आहेत.
या विभागात डॉ. स्मित पवार, डॉ. सुजित गवळी. डॉ. राज शाह हे रुग्णांची तपासणी करीत आहेत. त्वचा विकारावर उपचारासाठी रुग्णांनी ओपीडी काळात सकाळी ९ ते १ या वेळेत यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी केले आहे.