नांदेड, वृत्तसंस्था I करोना संपतो न संपतो तोच आता देशावर बर्ड फ्ल्यूचे सावट निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची प्रकरणे समोर येत असताना महाराष्ट्रात देखील त्याचा शिरकाव झाला आहे. आधीच कोंबड्या आणि विविध पक्षी मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहेत. आता मधमाशांचा देखील संशयास्पद मृत्यू होत असल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
नांदेडमध्ये शेकडो मधमाशांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात शेकडो मधमाशा मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात आधीच तीन पोल्ट्री व्यावसायिकांच्या 800 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या होत्या.
शेजारीच असलेल्या परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूमुळे 800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला. आता इतर जिल्ह्यातही या रोगाने पाय पसरले आहेत. राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, परभणी बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे बर्ड फ्ल्यू रोगाचा संसर्ग दिसून आलेला आहे.
दरम्यान बर्ड फ्ल्यू हा आजार अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.