शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची परंपरा असलेल्या श्रीराम मंदिरात सकाळी वि.हि.प.रा.स्व.संघ तसे श्रीराम भक्त यांच्या उपस्थितीत पुजा, आरती करून आयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी धनसंचय अभियानास शुभारंभ करण्यात आला.
भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात यांनी या अभियानाच्या मागचा उद्देश विषद केला. अयोध्येतील या श्रीराम जन्मभुमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांचे व शेंदुर्णीचे अनोखे नाते आहे. महाराज प्रवचनाच्या निमित्ताने शेंदुर्णीत बहुतांश वेळा आलेले असुन त्यांच्या भगिनी शेंदुर्णी शहरातच राहत असल्याचे सांगुन आज श्रीराम मंदिरात या निधीसंचयनाचा प्रारंभ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी या कार्यात सहयोग देण्याचे आवाहन केले.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्व जाती धर्माच्या शेवटच्या घटकांचा समावेश असावा त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातुनच अयोध्येत प्रभु रामरायाचे भव्य मंदिर निर्माण होणार आहे. याचाच भाग म्हणुन शेंदुर्णी तालुक्यात आज श्रीराम मंदिरात विधीवत पुजन करून श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांच्याकडून पारळकर परिवारातर्फे प्रथम सहयोग निधी घेऊन निधी धनसंचयास प्रारंभ झाला.
यावेळी भाजपचे जिल्हा नेते गोविंद अग्रवाल, पारस जैन पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश झंवर, पं. दिनदयाल पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे ह.भ.प. कडोबा महाराज माळी, ह.भ.प. नारायण महाराज हिवाळे, वामनराव फासे, अजय जहागिरदार, शेंदुर्णी तालुका संघ चालक उमाकांत भगत, नगरसेवक निलेश थोरात, सतिष बारी, अभियान प्रमुख अतुल पाटील, सहाय्यक अभियान प्रमुख राजेंद्र आस्वार तसेच रा.स्व.संघ,वि.हिं.प.व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तदनंतर शहरातील काही ठिकाणी धनसंचय करण्यात आला असुन १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत अभियान चालणार आहे. १५ जानेवारीपासून मोठ्या प्रमाणावर निधी संचयनास सुरुवात होणार असुन सर्व जाती धर्माच्या सहकार्यातुन हे भव्य मंदिर उभारण्यात येणार असुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


