जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता कोरोना लसीकरणाचा ड्राय रन कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन त्यांची चाचणी केली जाणार आहे. याबाबत गुरुवारी ७ रोजी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेज येथे गुरुवारी ८ रोजी ड्राय रन अर्थात रंगीत तालीम होणार आहे. यावेळी “थ्री रूम सेट अप” ही पद्धत राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असणार आहे. त्यात प्रथम नाव नोंदणी झाल्यानंतर त्यांना लसीकरण केले जाईल. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात अर्धा तास ठेवून त्यांची पाहणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. त्यानुसार आवश्यक साधनसामग्री आणि कक्षांची पाहणी गुरूवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण आणि अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी केली. यावेळी त्यांनी कक्षांची पाहणी करीत आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना विविध सूचना दिल्या. लसीकरणाच्या पेट्या, तात्काळ औषधी सेवा हे ठेवले जाणार आहे.