जळगाव : वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक घटकाने “मिशन मोड” मध्ये काम केले तर रुग्णालय हे सुजलाम सुफलाम होते. त्यासाठी आपले महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यभरात आदर्श होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या कामात झोकून देऊन काम केले तर आपण नक्कीच यशाची भरारी घेऊ शकतो असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
येथील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात ज्यांनी एचआयव्ही नियंत्रण व प्रतिबंधासाठी उत्तम कार्य केले त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन बुधवारी ६ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.जागतिक एड्स दिन २०२० च्या निमिताने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, यांचे मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक एड्स दिनानिमित्ताने ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असणाऱ्या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मंचावर कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, कार्यक्रम व्यवस्थापक नीरज महाजन, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी प्रमोद बोराखेडे उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद याना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील २३ आयसीटीसी, समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ART केंद्र, DSRC केंद्र यांना गौरविण्यात आले. प्रसंगी प्रस्तावनेत जिल्हातील एचआयव्ही कार्यक्रमाविषयी संजय पहुरकर यांनी माहिती सांगितली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले कि, स्वच्छता व शिस्त आपल्या रुग्णालयाचा प्राण आहे. तो कायम ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला उपचारासाठी येताना आनंद वाटतो. आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे चांगले काम करण्याऱ्या कर्मचारी व अधिकारी याचा उत्कृष्ट कामाबद्दल गौरविणे गरजेचे असल्यामुळे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक आहे. अशा या कार्यक्रमामुळे त्यांना अजून चांगले काम करणेसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. एचआयव्ही निर्मूलनासाठी नियोजन व कृती कार्यक्रम महत्वाचे ठरतात, असेही डॉ. रामानंद म्हणाले.
या कार्यक्रमासाठी गिरीश गडे, शुभांगी पाटील, मोजीन खान, रुपाली दीक्षित, प्रशांत पाटील, सुवर्णा साळुंखे, मनीषा वानखेडे, उज्ज्वला पगारे आदींनी परिश्रम घेतले.