जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचार्यांच्या मारहाणीमुळे मृत पावलेला कैदी रवींद्र जगताप उर्फ चिन्या याच्या पत्नीला कारागृह अधिक्षकांकडून धमक्या येत असल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेत संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात मारहानीमुळे झालेल्या मयत रवींद्र जगताप उर्फ चिन्या या कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याला मारहाण करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच चिन्याची पत्नी मीनाबाई यांनी न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांना अधीक्षकांकडून धमकी दिली जात असल्याची तक्रार केली आहे. मीनाबाई जगताप यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांना धमकावले जात आहे.
कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी, अण्णा काकड, अरविंद पाटील आणि दत्ता खोत हे राजकीय, प्रतिष्ठित लोकांमार्फत दबाव आणत आहे. ते धमकी स्वरुपाचे निरोप पाठवत आहे. त्यामुळे स्वत:सह कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून संबधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करून मीनाबाई जगताप यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. तर त्यांनी याच मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे.