जळगाव : सुवर्णनगरी जळगावात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात सोने आणि चांदीची चमक कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, सोन्या चांदीला मागणी चांगली आहे. गेल्या 18 ते 20 दिवसांपासून दररोज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price)चढउतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या दरात जास्तीत जास्त 500 रुपयांनी प्रतितोळे वाढ होत असून एवढेच दर कमी होत आहेत. सुवर्ण नगरी जळगावात आज सोन्याचे भाव सोने 51,613 प्रति तोळा तर चांदी 69,886 प्रति किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीच्या गुंतवणुकीबाबत संभ्रम असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे स्थानिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीला प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीवर सट्टा लावला जात आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंचे भाव अस्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांची सोने आणि चांदीच्या विक्रीला पसंती
दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी सोने व चांदी विक्रीला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठेत सोने व चांदीचे भाव घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या भावामध्ये अस्थिरता आहे.
यापुढे नेमकी परिस्थिती काय, हे अनिश्चितच
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खूप अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव घसरत आहेत. आता यापुढे नेमकी काय परिस्थिती राहील, हे अनिश्चितच आहे. मात्र, सोने अजून घसरण्याची शक्यता असली तरी सोन्याचे भाव हे यापुढच्या काळात 47 हजार ते 52 हजारांच्या दरम्यान राहू शकतात. चांदीच्या बाबतीतही हीच स्थिती असेल, असा अंदाज आहे.