जळगाव- एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतांना खडसेंनी प्रतिक्रिया दिली होती की, अद्याप मला नोटीस मिळालेली नाही, मात्र आता
आपल्याला ईडीने पाठविलेली नोटीस मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
काल सायंकाळी उशीरा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार ईडीने त्यांना चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच याबाबत प्रतिक्रिया देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला जेव्हा नोटीस मिळेल तेव्हाच आपण या प्रकरणी बोलू असे ते म्हणाले होते.
या पार्श्वभूमिवर, आज दुपारी एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आपल्याला मुद्दाम नोटीस देण्यात आली असून आपण या चौकशीला सामोरे जाऊ. ही नोटीस मिळाल्यानंतर आपल्याला राज्यभरातून फोन येत असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.