जळगाव – ग्राहक हितासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यात ग्राहक संरक्षण अधिनियम-2019, दि 20जुलै, 2020 पासून लागू करण्यात आला आहे. केंद्र शासनाने यावर्षी साजरा करावयाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “New Features Of consumer protection Act, 2019” ही संकल्पना निश्चित केली आहे. या संकल्पनेचे महत्व विषद करणारे विशेष सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारव्दारे 24 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्याक्रमाव्दारे जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जळगाव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वैधमापन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास वेबिनार माध्यमाव्दारे तालुका तहसिल कार्यालयही ऑनलाईन जोडले जाणार आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेच्या निर्देशांचे अधीन राहूनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तालुका कार्यक्रम आयोजित करतांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सर्व तहसिल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.facebook.com/Collectorate-Jalgaon या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या नवीन तरतुदींची माहिती करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.