जळगाव प्रतिनिधी । गोलाणी मार्केट परिसरातून सुगोकी हॉटेलसमोरून आज सकाळी दुचाकी लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील निवृत्तीनगर येथे रणछोडाराम तेजराम चौधरी (वय ३०) हे वास्तव्यास आहेत. त्यांचा भाऊ परशुराम चौधरी यांच्या नावावर असलेली दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.टी.५३७२) ही रणछोडाराम हे वापरतात. २० रोजी सकाळी साडे नऊ वाजता रणछोडाराम हे खाजगी कामासाठी गोलाणी मार्केट परिसरात आले होते.
यादरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी गोलाणी मार्केट परिसरातील सुगोकी हॉटेल समोर पार्किंग केली. काम आटोपून दुपारी साडेबारा वाजता ते परतले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने तक्रारींसाठी शहर पोलिस स्टेशन गाठले. तक्रारीवरून शहर पोलिसात २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.