जळगाव- शहरात बेकायदेशीर सिगारेटचा साठा पोलीसांनी जप्त केला असून या प्रकरणी दुकान मालकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजराल पेट्रोल पंप परिसरातील संतोष ट्रेडर्स येथे वैधानिक इशारा व मूल्याचा उल्लेख नसणार्या बेकायदेशीरपणे सिगारेट विक्री होत असल्याची तक्रार मुंबई येथील व्ही. केअर या सामाजिक संस्थेकडे तक्रार आली होती. त्यानुसार संस्थेचे सभासद अखिलेश पांडे (वय ४६, रा. बांद्रा पूर्व, मुंबई)यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. कुमार चिंथा यांची भेट घेऊन तक्रारीसंदर्भात माहिती दिली.
सदर तक्रारीनुसार जिल्हापेठ पोेलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, करुणासागर जाधव यांच्या पथकाने संतोष ट्रेडर्स येथे जाऊन तपासणी केली. या वेळी दुकानात तीन कंपनीच्या सिगारेटची ६९० पाकिटे मिळून आली. या पाकिटांवर वैधानिक इशारा व किमतीचा उल्लेख केलेला नव्हता. यामुळे या सिगारेट बनावट असल्याचे दिसून आल्याने पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानमालक अरुण पाटील याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३चे कलम ७ (३), २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.