मुंबई – कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्था बंद होत्या. परिणामी शिक्षक भरतीही थांबली होती. 23 नोव्हेंबर 2020 पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यामुळे शिक्षक संघटनांकडून शिक्षक भरती सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल राज्य सरकारने घेतली असून उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आल्याची घोषणा केली.
शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे व त्यासाठी लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी या मागणीस मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण आयुक्तांच्या मार्फत भरती प्रक्रिया सुरू करत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असून विशेषतः गणित व विज्ञान शिक्षकांचा मोठा तुटवडा असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकित दिली होती. त्यानुसार ही मागणी राज्य सरकारने मान्य केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान दिली.