पाचोरा ;- दिल्ली येथे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाठिंबा म्हणुन आज सकाळी ८ वाजेपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
शाळा, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, लॅब, बॅंका, शासकीय कार्यालये, दुध डेअरी हे वगळता शहरातील विविध किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, कापड दुकाने, मोबाईल शाॅप, सलुन, पान टपरी, अशा दुकानदारांनी आपली दुकाने बंदच ठेवली होती. या एकदिवसीय बंदला यशस्वी करण्यासाठी पाचोरा – भडगाव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी शहरातील चौकाचौकात उभे राहुन व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना आप आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे सह महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा नोंदविला आहे. पाचोरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.