नवी दिल्ली – कोविड प्रतिबंधात्मक लसनिर्मात्या कंपन्यांनी त्याच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मागितल्याच्या वृत्ताने प्रोत्साहित होऊन गुंतवणूकदारांनी बाजारात समभाग खरेदीचा सपाटा लावला. परिणामी सेन्सेक्स प्रथमच ४५,४२६.९७ वर पोहोचला. तर निफ्टी १३,३५५.७५ पर्यंत झेपावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये सोमवारी अनुक्रमे ३४७.४२ वर ९७.२० अंशांनी वाढ झाली आहे.
Share Market : सेन्सेक्स प्रथमच व निफ्टीत वाढ
मुंबई निर्देशांक आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात ४५,४५८.९२ पर्यंत उंचावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने व्यवहारात १३,३६६.६५ पर्यंत वाढ नोंदविली होती.
निफ्टीने सलग पाचव्या व्यवहारात विक्रमी स्तरनोंद केली आहे. शुक्रवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास पाऊण टक्क्य़ापर्यंत वाढले.
फायझर तसेच सिरम इन्स्टिटय़ुट या आघाडीच्या आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांनी विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीच्या तातडीच्या वापरासाठीची परवानगी संबंधित नियामक यंत्रणेकडे मागितली आहे. यामुळे लस लवकरच प्रत्यक्षात येण्याबाबतच्या आशेने सोमवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीचे मोठे व्यवहार केले.
सेन्सेक्समध्ये हिंदुस्थान यूनिलिव्हरचा समभाग सर्वाधिक, ३.०९ टक्क्य़ांसह झेपावला. त्याचबरोबर भारती एअरटेल, एचडीएफसी लिमिटेड, आयटीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, सन फार्मा, ओएनजीसी, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँकही वाढले.
कोटक महिंद्र, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आदी घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, आरोग्यनिगा, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू २.७८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. ग्राहकोपयोगी वस्तू तसेच स्थावर मालमत्ता निर्देशांक काही प्रमाणात घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी १.३० टक्क्य़ांपर्यंत वाढले.
रुपयात घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी १० पैशांनी घसरला. परकीय विनिमय चलन मंचावर स्थानिक रुपया ७३.९० वर स्थिरावला. व्यवहारात अमेरिकी डॉलर व्यवहारातील गेल्या अडीच वर्षांच्या तळातून बाहेर आले.
अजून वाचा
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या