जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील येथील सावदा नगरपालिकेतील नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी 2006 ते 2011 या कालखंडात पत्नी हेमांगी चौधरी नगराध्यक्ष असताना पदाचा दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असतानाही स्वतःसाठी मात्र कमी घरपट्टी लागू केली आणि नगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले म्हणून त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा खटला जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता.
त्याचा सोमवारी ७ डिसेंबर रोजी निकाल लागला असून तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करून यातील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना दोषी मानून त्यांना नगरसेवक म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निकाल त्यांनी सोमवार दिला आहे.
अजय भागवत भारंबे रा.सावदा यांनी याबाबत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकार्यांनी ऐकून घेतले होते.
त्यानुसार सोमवारी त्यांनी अंतिम निर्णय जाहीर केला. त्यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत पत्नी नगराध्यक्ष असताना स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा आरोप आरोप सत्य असल्याचा निष्कर्ष निघत आहे. सर्व नागरिकांना वाढीव घरपट्टी लागू केलेली असताना राजेंद्र चौधरी यांनी मात्र नगराध्यक्ष पदाचा दुरुपयोग करून स्वतःसाठी कमी घरपट्टी लागू केली. जुन्या दराप्रमाणे त्यांनी स्वतःच्या घरासाठी घरपट्टीचे जुने दर लावले असे तक्रारीत नमूद आहे.
त्यानुसार राजेंद्र चौधरी यांनी त्यांच्या खुलासा मध्ये सांगितले होते की, दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट असून यात कुठलेही तथ्य नाही. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


