जळगाव – अलीकडेच केंद्र सरकारने आयुर्वेदीक पदवीधरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याच्या विरूध्द आता देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) २० नोव्हेंबेर रोजी आयुर्वेद पदवीधरांना विविध प्रकारच्या ५८ शस्त्रक्रियेला परवानगी देण्याचे जाहीर केले आहे. या अधिसूचनेच्या विरोधात देशभरात लढा देण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ८ डिसेंबर रोजी निदर्शने, ११ डिसेंबर रोजी दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या या अधिसूचनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आयुष्यांची ३५ वर्ष घालवणार्या डॉक्टरांना मागे टाकून सहा वर्षात अर्धशिक्षित डॉक्टर शस्त्रक्रिया करतील. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रापेक्षा सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होईल, असे आयएमएच्या पदाधिकार्यांनी सांगितली. या विरोध आंदोलनाचा पहिला टप्पा देशातील २० हजार डॉक्टर विद्यार्थी करीत आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यात ज्युनिअर डॉक्टर सहभागी होतील. त्यानंतर आयएमए स्थानिक पातळीवर अत्यावश्यक सेवा वगळून दिवसभर ओपीडी बंद ठेवेल. त्यानंतर राष्ट्रीय आयएमएतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. तसेच सर्व आयएमए शाखा स्थानिक जिल्हा न्यायालयात खटले दाखल करणार आहे.
ही माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.