पुणे – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अकरावी वर्गासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. दिवाळी सुट्टीमुळे हे वर्ग थांबवले होते. आता पुन्हा गुरुवारपासून ऑनलाइन तासिका सुरू झाल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाइनद्वारे तासिका दि. 2 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने घरी राहूनदेखील विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हे वर्ग सुरू केले. त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सकाळी 8:40 ते 10:40 या वेळेमध्ये लाइव्ह केले जात आहे.
दिनांक 11 नोव्हेंबरपासून दीपावली सुट्या तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या इतर शालेय कामकाजामुळे दि. 2 डिसेंबरपर्यंत तासिकांचे लाइव्ह प्रक्षेपण थांबवले होते. तथापि सदरचे प्रक्षेपण पुनश्चः तीनही शाखांसाठी सुरू केले आहे. सर्व दैनिक तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर उपलब्ध आहे.