जळगाव- ऍड. विजय भास्करराव पाटील यांनी एमआयडीसीकडून जामनेर जिल्हा जळगाव येथील एमआयडीसी साठी संपादन केलेल्या जागेची रक्कम रिलीज न करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,एमआयडीसी, महाराष्ट्र राज्य यांना तक्रार केली आहे.
या तक्रारीत असे दिले आहे की, जामनेर जिल्हा जळगाव येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पासाठी शासनाने जमीन अधिग्रहित केल्याचे समजते जामनेर येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी काही व्यापाऱ्यांनी राजकीय सत्तेचा वापर करून शेतकऱ्यांकडून किरकोळ भावाने जमिनी खरेदी केल्या असून त्या जमिनीवर बोगस वृक्षलागवड व इतर कृषी उद्योग दाखवून शासनाकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे तसेच यामध्ये शासनाची स्टॅम्प ड्युटी देखील बुडवली आहे.सदर घोळ हजारो कोटी च्यावर असल्याचे समजते.
नुकतेच जळगाव येथे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी संस्थेवर पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या असून त्यातून सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपींचे प्रस्तावित जामनेर एमआयडीसीच्या जागेशी संबंधित असल्याचे समजते. तसेच शासनाने या अधिग्रहित केलेल्या जमिनी ज्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या आहेत त्या व्यक्तींची नावे भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहेत. व सदर गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये देखील त्या आरोपींचे नावे आलेली आहेत.
या अधिग्रहित केलेल्या जमिनी पोटी एममायडिसी लवकरच मोठी रक्कम अदा करणार असल्याचे देखील समजते. सदर जमिनीचा मोबदला आपण सध्य परिस्थितीत देऊ नये कारण या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे करीत आहे. सदरची रक्कम कोणत्याही परिस्थितीत वितरीत करण्यात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामास एमआयडीसी व त्याचे अधिकारी जबाबदार राहतील.