न्हावी ता. यावल – सध्या समाजात मुलगी नको, मुलगा हवा अशी स्थिती असताना, पहिली बेटी धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते आणि मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे; मात्र रावेर तालुक्यातील चिनावल येथील वाघ कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत केले असून वाघ कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिनावल येथील सुकन्या व सिद्धार्थ वाघ या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. सुकन्या वाघ यांनी आपल्या माहेरी १९ ऑक्टोबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर सव्वा महिन्यानंतर सुकन्या वाघ या सासरी चिनावल येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासह मुलगी त्रिशा चे औक्षण करत ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात स्वागत केले.
यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून तसेच घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत केले. मुलगी ही परक्याचे धन असते म्हणून मुलगी नको अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे; मात्र वाघ दाम्पत्याने मुलीचे अनोखे स्वागत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली असे म्हणून तिचा गौरव देखील केला. अश्या या स्तुत्य उपक्रमा मुळे वाघ दाम्पत्याचे पूर्ण पंचक्रोशीतील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.