जळगाव प्रतिनिधी । शहरातील गौरव हॉटेलजवळ आज सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत तालुक्यातील कानसवाडी येथील माजी सरपंचचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी जिल्हा रूग्णालयात मृतदेह पाहून नातेवाईकांनी मन हेलवणारा आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामानंद नगर परिसरातील रहिवाशी विकास बंडू सोनवणे (वय-55) रा. कानसवाडी ता.जि.जळगाव ह.मु. रामानंद नगर जळगाव हे रस्त्यांच्या कामाचे ठेकेदाराचे काम करतात. विकास सोनवणे हे कानसवाडी गावाचे माजी सरपंच आहे. जळगाव तालुक्यातील विविध भागात रस्त्ये दुरूस्तीचे कामे घेतली आहे.
कानसवाडी येथे त्यांची आई राहते. आज सकाळी ६ वाजता आईला भेटण्यासाठी ते दुचाकी क्रमांक (एमएच १९ – ६९४०) ने दुचाकीने कानसवाडी येथे गेले. आई व गावातील नातेवाईकांना भेटून कानसवाडी येथून नशिराबादला कामाच्या निमित्ताने गेले. नशिराबाद येथून काम आटोपून जळगावला येत असताना जळगाव शहराजवळ असलेल्या हॉटेल गौरव जवळ समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. दरम्यान, कानसवाडी येथील नागरीकांची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. मयत विकास सोनवणे यांचा मृतदेह पाहून त्यांची मुलगी, मुलगा आणि नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश केला होता.. त्याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी, भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.