जळगाव- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर प्रकरणी बोलतांना सांगितले की, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकत कारवाई केली असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने अधिक बोलत नाही, मात्र चौकशी संपल्यावर पत्रकार परिषद घेऊन बीएचआर संदर्भातील शासनाकडे केलेल्या तक्रारीचा संपूर्ण पत्रव्यवहार देणार असून या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री यांचे देखील रेकॉर्ड देणार असल्याचे देखील सांगितले.
तसेच एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी शासनाकडे देखील तक्रारी केल्या होत्या. खडसे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी केल्या आहेत. खासदार रक्षाताई खडसे यांच्या लेटरहेडवर सुद्धा तक्रारी केल्या आहेत. या सोबतच वकील कीर्ती पाटील यांनी देखील तक्रारी केल्या होत्या. जवळपास सोळा ते सतरा तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या सरकारने ही कारवाई थांबवून ठेवले होती, असा आरोपही फडणवीस सरकारचा नाव न घेता खडसे यांनी केला. एक-दोन दिवसात आर्थिक गुन्हे शाखेची चौकशीत संपल्यावर एकनाथराव खडसे सर्व रेकॉर्ड देणार असल्याने आता यात कोणाची नावे समोर येतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हा घोटाळा काही हजार कोटीचा असल्याचे बोलले जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटीचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यात राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडविण्याचे केंद्र, कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार आणि अनेक कायदे, नियमांचे सर्रास उल्लंघन असे अनेक प्रकार गैरप्रकार केल्याचा आरोप या पतसंस्थेवर आहेत. भाई हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था आणि मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थांवर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई कारवाई मात्र करू शकत नव्हते, त्यामुळे सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता. बँकेच्या भागधारकांच्या ठेवीदारांची फसवणूक आहे. त्यामुळे या धाड सत्रानंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.