जळगाव प्रतिनिधी । बीएचआर मल्टी-स्टेट सहकारी बँकेतील अपहार प्रकरणी काल सकाळपासून पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ही दुसर्या दिवशी सुध्दा सुरूच असल्याचे दिसून आले आहे. बीएचआर मल्टी-स्टेट सहकारी बँकेतील अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना आज नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस उपआयुक्त पोर्णिमा गायकवाड, भाग्यश्री नवटके व सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी सुजीत बाविस्कर, धरम किशोर सांकला, महाविर मानकचंद जैन, विवेक देविदास ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे.
तर यातील अन्य आरोपी अवसायक जितेंद्र कंदारे,प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनिल झंवर, योगेश साकला आणि इतर काही आरोपींचा शोध घेत आहेत. यात अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांना आज न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बेनामी ठेवी व आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या बीएचआर सहकारी बँकेवर केंद्रीय सहकार आयुक्तांनी अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती केली होती.
मात्र याच कंडारे यांनी इतरांशी संगनमत करून सुमारे हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. यातून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.