बीजिंग: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. या दरम्यान चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये काही वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले. मात्र ते भारतीय जवानांनी हाणून पाडले. मात्र तरीही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. त्यासाठी चीननं सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. मात्र पूर्व लडाखमध्ये कडाक्याचा हिवाळा चिनी सैनिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर तैनात असलेल्या चिनी सैन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात या भागातून एका सैनिकाची प्रकृती बिघडल्यानं त्याला वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. या भागात रात्री पारा वेगानं घसरतो. त्यामुळे चिनी सैनिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. थंडी वाढल्यानं अनेक चिनी सैनिकांची प्रकृती बिघडली आहे.
पँगाँग सरोवराला लागून असलेल्या १५ ते १६ हजार फूट उंच डोंगरांवर ५ हजार चिनी सैनिक तैनात आहेत. थंडीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक बंकर तयार करण्यात आल्याचा दावा याआधी चीननं केला होता. या बंकरमधील तापमान कमी असेल, असं चीनकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती चीनचे दावे फोल ठरताना दिसत आहेत.
चिनी सैन्य युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम करत असल्याचं तिथल्या सरकारी माध्यमांनी म्हटलं होतं. अस्थायी बंकरच्या जागी नवीन आणि स्थायी बंकर उभारले जात असल्याचं वृत्त सरकारी वृत्तवाहिनी सीसीटीव्हीनं दिलं होतं. मात्र या बंकरची उभारणी कधी सुरू केली आणि त्यांच्या बांधकामासाठी किती वेळ लागला, याची कोणतीही माहिती सीसीटीव्हीनं दिली नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सैन्यासाठी सुविधा निर्माण केला जात असल्याचं सीसीटीव्हीनं म्हटलं होतं.