मुंबई | भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याला विधान परिषदेवर आमदार करा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनानं राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पत्र पाठवून विनंती केलीये.
राज्यपाल कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे गोलंदाज झहीर खान यांच्यासह 12 जणांच्या नावाचा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विचार करावा, अशी विनंती केलीये. सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सकाळी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना यादी सादर केलीये.
विधान परिषदेवर 12 सदस्यांची राज्यपाल नियुक्ती करतात. यामध्ये साहित्य, कला, सहकार किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असतो. यावेळी सदाभाऊ खोत यांनी, राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांच्या कार्याचा सन्मान करा, शिवाय धोरण ठरवणाऱ्या मोठ्या सभागृहाचं सदस्य करून त्यांच्या विचारांचा उपयोग करून घ्या, असंही सांगितलंय.
या यादीत क्रिकेटर झहीर खान, अभिनेते मकरंद अनासपुरे, लेखक विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, डॉ. तात्याराव लहाने, सामाजिक कार्यासाठी अमर हबीब, प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, पोपटराव पवार, डॉ. प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज आणि बुधाजीराव मुळीक यांचा समावेश आहे.