जळगाव – रथ चौकात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील रथचौकात मुनेश सुपडू बारी (वय-४६ रा. बालाजी पेठ) यांचे चहाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते चहाचे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यांना एक अनोळखी व्यक्ती हालचाल न करता निपचित पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी शनीपेठ पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून अंदाजे ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीस जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषित केले. मुनेश बारी यांनी दिलेल्या माहितीवरून, शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हे.कॉ. रघूनाथ महाजन करीत आहे. सदरील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शनीपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी केले आहे.