जळगाव – विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीती आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, भाजपचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्यांचे महत्त्वपूर्ण आवाहन आणि ग्वाही : खासदार स्मिताताई वाघ
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी “स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनहिताचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” अशी ग्वाही त्यांनी शिवसेना नगरसेवकांना दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, नंदकिशोर महाजन हे विकासाचे स्पष्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन आपण सर्वांनी निवडून आणूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीमुळे महायुतीमधील समन्वय अधिक मजबूत झाला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपातील राजकीय वातावरण चांगलेच महायुतीमय झाले आहे.


