जळगाव – गुरुपौर्णिमेच्या दिवशी इम्पिरियल प्री-प्रायमरी स्कूल येथे गुरुपौर्णिमा अत्यंत श्रद्धा, भक्ती व उत्साहात साजरी करण्यात आली.
या पावन प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. शोभादेवी नरेश चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना झाला. त्यांनी गुरुंच्या जीवनातील महत्त्वावर प्रकाश टाकत प्रेम, समर्पण आणि मार्गदर्शन या मूल्यांची आठवण करून दिली.
कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे माता पालकांचा सहभाग. त्यांनी ‘आई, बहिण, सुन आणि मुलगी’ या विविध नात्यांतून गुरुचे स्थान प्रभावीपणे मांडले. “गुरुत्व म्हणजे केवळ शिकवणं नाही, तर जीवन जगण्याचं प्रेरणास्थान आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांना नमन करून त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आई-वडील हे जीवनातील पहिले गुरू आहेत, हे भावनिक क्षण उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन आले.
कार्यक्रमात पर्यावरणप्रेम दाखवत शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या प्रांगणात कुंडीमध्ये रोपे लावली आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याची शपथ घेतली. ही प्रतीकात्मक कृती विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, संवेदनशीलता व जबाबदारीची भावना रोवणारी ठरली.
शिस्तबद्ध, सुसंगत आणि भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या एकत्रित सहभागामुळे हा गुरुपौर्णिमा सोहळा संस्मरणीय ठरला.


