जळगाव – शहरातील जुना आसोदा रोडवर उभे असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने जळगावातील मारोती पेठेत सुभाष पितांबर काळे हे कुटूंबियांसह वास्तव्यास असून त्यांचे कानळदा शिवारात शेती आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच रोटाव्हेटर, बैलजोडी हे त्यांच्या जुना आसोदा रस्त्यावर असलेल्या खळयात असते. गेल्या दोन वर्षांपासून भुरा घुमसिंग पावरा हा सालदार म्हणून कामाला आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे ५ वाजता सालदार भुरा हा त्याच्या घरी जाणार होता. त्यामुळे सकाळी ६ वाजता सुभाष काळे हे आसोदा रस्त्यावरील खळ्यात आले. खळ्यात साफसफाई करीत असताना त्यांचे लक्ष ट्रॅक्टरकडे गेले. त्यावेळी त्यांना ट्रॉली दिसून आली नाही़ लागलीच त्यांनी मुलाना विचारणा केला.
मात्र, ट्रॉलीबाबत काहीही माहित नसल्याचे सांगितले़ सालदाराला संपर्क साधले असता, त्याला देखील ट्रॉलीबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांना कळले. अखेर परिसरात शोध घेवून देखील ट्रॉली न मिळून ती चोरी झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी सुभाष काळे यांच्या फिर्यादीवरून (एमएच १९ बीक्यू १०४८) क्रमांकाची सुमारे चाळीस हजार रूपये किंमतीची ट्रॉली चोरून नेल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.