जळगाव – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले तर या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील जवळपास 550 खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणूक निकाल उद्या जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल तसेच सध्या सुरू असलेल्या या तायक्वांदो स्पर्धेत तुम्ही खेळून जिंकाल तेव्हा मैदानावरचे खरे आमदार तुम्ही असाल असे व्यक्तव्य या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री जोशी यांनी करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण 26 जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या खेळाडू मधुन 28 वजनी गटात प्रत्येकी एक प्रथम क्रमांक निवडला जाईल तर प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू दिनांक 29 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक श्री अजित घारगे यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू राहणार असून या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केले असल्याचे आयोजक श्री घारगे यांनी प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.