मुक्ताईनगर – मुक्ताईनगर मतदारसंघासात महायुतीचे सरकार आल्यापासून विकास कामांसाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील जाहीर सभेत सांगितले होते परंतु मतदारसंघात कुठेच विकास झालेला दिसून येत नाही. मग एवढा निधी गेला कुठे असा प्रश्न जनतेला पडला असुन निमखेडी खुर्द हे गाव आमदारांनी विकसासाठी दत्तक घेतलेले गाव आहे इथे तरी ५ हजार कोटी मधून झालेला विकास सापडेल अशी मला आशा होती परंतु इथे तर गाव अंतर्गत रस्ते, गटारी यांची दुर्दशा झालेली असून विकास नावालासुद्धा सापडत नाही आहे मग ५ हजार कोटींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी निमखेडी खुर्द येथे प्रचारादरम्यान उपस्थित केला.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे जनआशीर्वाद पदयात्रा काढून रोहिणी खडसे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आ. एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना, जातपात, पक्षीय मतभेद न करता सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील खेडोपाड्यांचा विकास केला. त्यांच्या माध्यमातून निमखेडी खुर्द गावाला चहूबाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले गावात सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, गटार अशा अनेक मुलभूत सुविधांची कामे करण्यात आली.
निमखेडी खुर्द हे गाव विद्यमान आमदारांनी विकासासाठी दत्तक घेतल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री महोदयांनी मुक्ताईनगरच्या सभेत मुक्ताईनगर मतदारसंघात ५ हजार कोटी रूपये विकास निधी दिल्याचे सांगितले होते. त्या विकास निधी अंतर्गत झालेला मतदासंघांत हरवलेला विकास सापडेल अशी मला आशा होती परंतु गेले पाच वर्षात गावाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. गावात रस्त्यांवरून सांडपाणी वाहत आहे त्यामुळे पायदळ चालताना त्रास होत आहे. आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेला विद्यमान आमदारांनीस्थगिती आणली. त्यामुळे ग्रामस्थांना घरापर्यंत पाणी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच एकनाथराव खडसे यांच्या कार्यकाळात मंजूर ग्रामपंचायत भवन बांधकाम प्रस्तावाला विद्यमान आमदारांनी स्थगिती दिली. सध्या आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या, सामाजिक सभागृहात ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे. दत्तक गावात पाच वर्षात नवीन ग्रामपंचायत इमारतसुद्धा विद्यमान आमदार निर्माण करु शकले नाहीत.गावांतील काही तरुणांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी मुक्ताईनगर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्यात येतील असे जाहीर केले होते परंतु अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत.
आ.एकनाथराव खडसे यांनी निमखेडी परिसरातील गोरगरीब घरातील मुलांना गावातच म माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीमार्फत निमखेडी येथे नवीन माध्यमिक हायस्कूलची स्थापना केली. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना गावात मध्यामिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. या हायस्कूलचे विद्यार्थी गरीब परिस्थितीतून पुढे येत आपल्या मेहनतीने उच्च शिक्षण घेत आहेत, काही विदयार्थी स्पर्धा परिक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे परिसराचे नाव उज्वल करत आहेत. त्याबद्दल मला या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. भविष्यात गावात मुलभूत सुविधांच्या निर्माणाबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत लायब्ररीचे निर्माण करेल, असा माझा शब्द असल्याचे सांगून, गावाचा मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आ.एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील, अरूणदादा पाटील, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानरुपी आशिर्वाद देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्र्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटील, सुवर्णाताई साळुंखे, रामभाऊ पाटील यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.