जळगाव – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीने प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली. आज दुपारी के.सी. पार्क परिसरात झालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे आजच्या रॅलीचे खास वैशिष्ट्य होते.
आज (दि.१७) महाविकास आघाडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून काढलेल्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ इंदिरा नगर येथून झाला. त्यानंतर संपूर्ण खेडी परिसर, माऊली नगर, शांताराम पाटील शाळा या मार्गे जात ज्ञान चेतना अपार्टमेंट येथे प्रचार दौऱ्याचा समारोप झाला.
जयश्री महाजन आपल्या विकासाच्या आणि शहर प्रगतीच्या मुद्द्यावर ठाम असून, यासाठी इतके दिवस केवळ भाषणातून वा सभांमधून त्या मांडत असलेल्या विकासाच्या मुद्द्यांची प्रॉमिसरी नोट करून त्यांचा वचननामाच आज हॅण्डबिल स्वरुपात जळगावकरांना दिला.
या वचननाम्यात जयश्री महाजन यांनी आपल्या शहर विकासाच्या महत्त्वाकांक्षी मुद्द्यांची माहिती दिली. यात एमआयडीसीचा विस्तार: शहरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार करण्याचे आश्वासन. नवीन चौपदरी रिंगरोड: कुसुंबा-शिरसोली रस्ता सावखेडा शिवार ते बांभोरीपर्यंत चौपदरी रिंगरोड तयार करण्यासाठी पाठपुरावा. उड्डाणपूल निर्मिती: आकाशवाणी, इच्छादेवी आणि अजिंठा चौफुली येथे वाहतूक सुलभतेसाठी उड्डाणपूल उभारणे. विमानतळाचा विस्तार: मोठ्या विमानांची ये-जा सुनिश्चित करण्यासाठी विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार. गाळेधारकांच्या समस्या सोडवणे, शहरातील गळेधारकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण आदी वचनांसह त्यांनी स्वतः ची स्वाक्षरी असलेली प्रॉमिसरी नोट आज हॅण्डबिल स्वरुपात दिल्याने, जळगावकरांच्या मनात त्यांच्याविषयीची विश्वासार्हता अधिक वाढल्याचे जाणवले.
सुरुवातीपासूनच आपल्या प्रचारातील नावीन्यतेने चर्चेत असलेल्या जयश्री महाजन यांच्या जाहीरनाम्यातील विकासाच्या वचनांमुळे जळगावकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराच्या प्रगतीसाठी त्यांनी मांडलेले मुद्दे नागरिकांना आशादायक वाटत असून त्यावर ठिकठिकाणी चर्चा रंगत आहे.
यावेळी विविध ठिकाणी संवाद साधतांना जयश्री महाजन यांनी जळगावकरांना “मशाल” या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू,” असे सांगत त्यांनी प्रभागाच्या प्रगतीचा निर्धार व्यक्त केला.
या प्रचार रॅलीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, विजय बांदल, विजय राठोड, यश उपाध्ये, सागर उपाध्ये, पंकज व्यास, संजय सांगळे, महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख निता सांगोळे, तसेच जया तिवारी, ललिता पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.