जळगाव – जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाज बांधवांनी जळगाव शहरात तब्बल २० दिवस आमरण उपोषण करून न्याय मागितला होता. त्यावेळी तुमचे आमदार झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित करून ‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही, अशी गर्जना शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली.
महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना उद्धव सेनेचे फायर ब्रॅन्ड नेते शरद कोळी यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. ज्याच्याकडे कधीकाळी साधी मोटारसायकल नव्हती, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती कुठुन आली. जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी निधी आणला म्हणतात, मग विकास गेला कुठे. या मतदारसंघाला कीड लागली आहे. हाताला काम नसल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. तुम्ही गुलाबराव देवकरांना आमदार करा, आम्ही त्यांना मंत्री करू आणि जळगाव ग्रामीणमधील आताच्या मंत्र्यांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी लावू. त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करू, असाही इशारा शरद कोळी यांनी भोकर येथील सभेत बोलताना दिला.
भोकरच्या पुलाचे उद्घाटन मीच करणार – गुलाबराव देवकर
तापी नदीवरील भोकर-खेडीभोकरी दरम्यानच्या पुलाचे काम गेल्या दोन पंचवार्षिकपासून रखडले आहे. हा पूल आम्हीच पूर्ण करू आणि त्याचे उद्घाटन देखील आम्हीच करू, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघ १० वर्षात पिछाडीवर पडला आहे. कोळी समाजाला प्रत्येक निवडणुकीत जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, पुढे काहीच हालचाल झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), शिंदे सेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, किसान सेलचे रवींद्र पाटील, भोकरचे माजी सरपंच हरीश पवार आदी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.