सावदा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सावदा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली परंतु विद्यमान लोकप्रतनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता रोहिणी खडसे या आमदार झाल्यास त्या पाठपुरावा करुन सावदा ग्रामीण रूग्णालयात आवश्यक पद भरती, औषधपुरवठा, यंत्रणा उपलब्ध करुन देऊन गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन देतील, असा विश्वास सोपान पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या मतदार संवाद दौरात ठिकठिकाणी ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.
मुक्ताईनगर विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांचा लुमखेडा, भिलवस्ती, उदळी खु, उदळी बु, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपुर, सुदगाव,मांगी चूनवाडे थोरगव्हाण या गावात मतदार संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. संवाद दौऱ्याच्या सुरुवातीला माजी आमदार स्व.आर.आर. पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावागावात माता भगिनींनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांनी रोहिणी खडसे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मतदारांनी रोहिणी खडसे यांना त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
याप्रसंगी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, शिक्षण,आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांचे निर्माण करण्यात आले. एकनाथराव खडसे यांनी गेल्या तीस वर्षात जातीपाती विरहित सर्वसमावेशक राजकारण करत, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला परंतु गेल्या पाच वर्षात मतदारसंघ विकासात मागे पडला असून मतदासंघांत जातीय तेढ निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
मतदारसंघांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून विकास कामे करण्याच्या तीन महिने आधीच सदर कामावरील शासकीय निधी काढून, ती कामे स्वखर्चातून केल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. काही ठिकाणी कामे न करता शासकीय निधी लाटला जात आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आणि मतदासंघांचा कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, मुलभूत सुविधा असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आ एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण दादा पाटिल, राजाराम महाजन, उदय सिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या निवडणुकीत आपल्या “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.
प्रचारादरम्यान गावोगावी महिला माझ्याजवळ येऊन गेल्या पाच वर्षात गावात अवैध नकली दारू विक्री वाढली असल्याची त्यातून अनेकांचे संसार उध्वस्त होत असून दारू विक्री बंद करण्याची मागणी करत आहेत. अवैध दारू विक्रीतून जीवितहानी घडल्याच्या मतदासंघांत घटना घडल्या असून या दारू विक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी आ. एकनाथराव खडसे यांनी गावागावांना डांबरी रस्त्याने जोडले प्रत्येक गावात मुलभूत सुविधांचे निर्माण केले. मतदासंघाचा विकास केला तरी विरोधक गेल्या तीस वर्षात काय केले हे विचारत आहेत. विरोधी उमेदवार गावात जाऊन ज्या सभागृहात छोटेखानी सभा घेत आहेत तेसुद्धा एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून झाल्याचे विसरतात आणि तीस वर्षात काय झाल्याचे विचारतात. एकनाथराव खडसे यांनी तापी नदीवर हतनूर, पिंप्री नांदू पुलांची निर्मिती केली त्यामुळे मुक्ताईनगर आणि रावेर तालुके जवळ आले एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालीत काही विकास कामे राहिले असली तरी ते पूर्ण करण्यासाठी रोहिणी खडसे या सक्षम असून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन दिपक पाटील यांनी केले.
यावेळी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटिल यांनी मतदारांशी संवाद साधताना आ एकनाथराव खडसे यांनी नाना विविध विकास कामे करून मतदारसंघाचा विकास केला त्यांनी सावदा आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊन मोफत उपचार मिळावे यासाठी सावदा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तू पुर्णत्वास आली आहे परंतु विद्यमान लोकप्रतनिधींकडून याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने रुग्णालयात आवश्यक डॉक्टर, नर्स, व इतर स्टाफ आणी आवश्यक मशिनरी साठी कोणताही पाठपुरावा केला गेला नाही त्यामुळे रुग्णालय जेमतेम सुरू असुन सुध्दा रुग्णांवर पाहिजे त्या प्रमाणात उपचार केले जात नाही.