जळगाव ( सुरेश उज्जैनवाल ) – ऐन लोकसभा निवडणुकीत जिल्हा सहकारी दूध संघाकडून उत्पादकांची आर्थिक लूट कशी सुरू आहे, हा विषय खासदार उन्मेष पाटील आणि दूध संघाचे अभ्यासू संचालक प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडत एका नवीन पण तेवढ्याच महत्वाच्या विषयाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.गेल्या गुरुवारी जळगाव येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून शेतकऱ्यांच्या हिताचा आव आणणाऱ्यांचा बुरखा यामुळे टराटरा फाडला गेला आहे. पत्रकार परिषदेतून झालेल्या आरोपांना संघांचे विद्यमान चेअरमन आ.मंगेश चव्हाण यांनी कोणतेही उत्तर न देणे किंवा कमी दर देत असल्याच्या मुद्द्यावर बोलती बंद ठेवणे यामुळे जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा बँकेनंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक श्वास असणारी जिल्हा दूध संघ ही दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. तत्कालीन राजकीय नेत्यांनी अतिशय जिद्द व चिकाटीने या संस्था उभ्या केल्या.लोक कल्याणासाठी त्यांनी पक्षीय राजकारणापासून या संस्था अलिप्त ठेवत समाजाला विकासाची दिशा दिली.परंतू अलीकडच्या काळात राजकारणातून सहकार क्षेत्रात आलेल्या बहुतेक लोकप्रतिनिधीमध्ये समाजाचा सार्वजनिक विकास या गुणाचा अभाव असल्याने या सस्था विकासाच्या नव्हे तर राजकीय गटातटाचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे.विद्यमान संचालक मंडळामध्ये सत्ताधारी म्हणून दूधसंघाची चाबी हाती असणाऱ्यांचा सहकारातील अनुभव आणि त्यांचे कार्य तरी काय ? अलीकडे शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहे.भाजपासह सर्वच राजकीय पक्ष आपणच कसे शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत,हे सांगताना थकत नाही.
भाजपाने तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केला आहे,असे असताना भाजपचेच आमदार मंगेश चव्हाण जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत.राज्यात सत्तेत महायुतीत असताना दुधाच्या दरातील हक्काचे अनुदान मिळवून देण्यात आ. चव्हाण हे मागे कसे ? असा प्रश्न पडतो.शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यातील दिरंगाई अथवा उदासीनता दूध उत्पादक शेतकऱ्याबद्दल आपुलकी नसल्याची बाब अधोरेखित करते.सुमारे सात कोटी अनुदानाचा हा विषय असून हजारो दूध उत्पादक अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहे.खासगी संस्था दूध उत्पादकांकडून 32 रुपये दराने दूध खरेदी करते तर संघ 27 रुपये दराने खरेदी करत आहे , शेतकऱ्यांचे प्रतिलिटर 5 रुपयाचे नुकसान हा कोणता शेतकरी कैवार आहे ? संघाच्या वातानुकूलित विश्रामगृहाच्या बांधकामावर लाखो रुपये खर्च केले जात आहे,हा खर्च दूध उत्पादक शेतकरी की संचालक मंडळींसाठी ?
माजी खासदार उन्मेष पाटील आणि संचालक प्रमोद पाटील यांनी दूध संघातील चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या कारभारावर उपस्थित केलेले मुद्दे किंवा घेतलेला आक्षेप लक्षात घेता त्यावर तातडीने खुलासा व्हायला हवा होता, परंतु चार दिवस उलटले,तरी चव्हाण किंवा त्यांच्या समर्थकांनी चकार शब्द काढलेला नाही.याच्या दोन शक्यता असू शकतात एक तर त्यांच्याकडे उन्मेष पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न अथवा मुद्दे वास्तव असल्याने खोडून काढण्यात अडचण असावी किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांशी निगडित हा मुद्दा सत्ताधारी चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांना गौण वाटत असावा.एरव्ही विरोधकांनी केलेल्या आरोपावर तत्परतेने उत्तर देत आरोप करणाऱ्यांनाच दोषी ठरविण्यात माहिर असणारे मंत्री गिरीष महाजन आणि त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारे निरुत्तर कसे? याचेच आश्चर्य वाटते. काही कारण असो पण खा.उन्मेष पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील
मुद्द्यांनी महाजन, चव्हाण यांची बोलतीच बंद केलीय, हेच यातून स्पष्ट होते.
(विश्लेषक हे ज्येष्ठ पत्रकार आणि व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.)