जळगाव – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्णत्वाला आले आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना (ठाकरे )गटाकडे गेला आहे. भाजपामध्ये उमेदवारीवरुन रण माजलेले असतांना शिवसेना ठाकरे गटातर्फे कोण उमेदवार असणार? हा प्रश्नही महत्वाचा ठरतो. पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गेल्या काही महिन्यात झालेले दौरे खरे तर ती चाचपणी करण्यासाठीच होते हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी रावेर लोकसभा निवडणुकीकडे फिरकुनही पाहिलेले नाही. त्यांचा सर्व रोख हा जळगाव लोकसभा मतदारसंघाकडेच होता.
ठाकरे गटातर्फे वरवर पाहिले तर काही नांवे चर्चेत आली. ती म्हणजे जिल्हाप्रमुख हर्षल माने, जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील, दुसरे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पाचोरा येथील सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांची. अमळनेर येथील भाजपाच्या नेत्या ॲड. ललिता पाटील यांनीही नुकतीच ठाकरे यांची भेट घेवून उमेदवारीची मागणी केली आहे. या नावातील एक नाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी मोठ्या खुबीने स्वत:ला लोकसभा निवडणुकीपासून बाजूला केले. त्यामुळे त्यांचे नाव बाद झाले. सौ. वैशालीताई यांची तयारी लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी आहे. त्यामुळे त्या लोकसभा लढायला इच्छुक नाहीत. मग राहीले दोन नांवे ती म्हणजे हर्षल माने व कुलभूषण पाटील.
या नावांची तुलना केली असता कुलभूषण पाटील यांचे नाव सध्यातरी आघाडीवर असल्याचे समजते. कारण त्यांनी उपमहापौर पदावर असतांना कमी कालावधीत केलेले काम, त्यांची संघटनशक्ती ही स्वत: उद्धव ठाकरे यांनी अनुभवलेली आहे. याउलट हर्षल माने इथे डावे होतात. जिल्हाप्रमुख पदासारखे प्रमुख पदावर वर्णी लागल्यानंतरही पक्ष संघटनवाढीसाठी त्यांनी काहीही ठोस केल्याचे निदर्शनास येत नाही. ठराविक भागातच संपर्क ही त्यांची आणखी एक कमजोर बाबही पक्षनेतृत्वापुढे आल्याचे सूत्रांद्वारा समजते. त्यांचा जनसंपर्क बघता लोकसभाच काय? तर विधानसभेच्याहीवेळी त्यांचा विचार होईल की नाही हे सांगता येत नाही. शिवाय त्यांच्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी (पक्षफूटीपुर्वी) त्यांच्या नियुक्तीच्या वेळी प्रखर विरेाध केला होता. ही बाबही त्यांना उमेदवारीपासून दूर नेते. याउलट कुलभूषण पाटील यांचा संपर्क माने यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशीही सौदार्हाचा राहीलेला आहे.