जळगाव (प्रतिनिधी) – शहरात सर्व सुविधांयुक्त असणारे अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा मानस घेऊन लाठी व सोमाणी परिवाराच्या शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि.च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मान्यवरांच्या हस्ते आज (दि.२४) सकाळी ११ वाजता उद्घाटन संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, पद्मश्री ॲड.उज्वल निकम, माजी मंत्री सुरेशदादा जैन, चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, डॉ.ए.जी.भंगाळे, उद्योजक सुनिल झंवर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्यासह शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि. चे अध्यक्ष ॲड.नारायण लाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य इमारतीसोबतच कोनशिला अनावरण झाल्यानंतर क्रमशः मुख्य द्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सिटी स्कॅन सेंटर, एम.आर.आय. कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष (ऑपरेशन थिएटर), कॅथ लॅब, आय.सी.यू. १ व २ तसेच जनरल वॉर्ड, फार्मसी याविविध सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात येवून, हॉस्पिटलच्या वेबसाईटचेही अनावरण करण्यात आले.
सुरुवातीला प्रास्ताविक करताना ॲड.राहुल राठी यांनी वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इंटेसिव्हिस्टच्या सेवेसह अत्याधुनिक आय.सी.यु., मॉड्यूलर ग्लास ऑपरेशन थिएटर, हृदय शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज कॅथलॅब, पूर्ण क्षमतेने कार्यरत असा आंतररुग्ण विभाग, वैद्यकियदृष्ट्या सुसज्ज व प्रशस्त रुम, वातानुकुलित जनरल वॉर्ड व शेअरींग रुम, २४ बाय ७ अपघात व आपत्कालीन विभाग, बाह्यरुग्ण विभाग, ३२ स्लाईस सी.टी.स्कॅन, स्ट्रेट टेस्ट टीएमटी, १.५ टेस्ला एम.आर.आय., सोनोग्राफी व पूर्णतः डिजीटल एक्सरे, पॅथॉलॉजी, फॉर्मसी, ॲडव्हॉन्स फिलिप्स अफिनिटी ७० २ डी इको, स्ट्रेन इमेजिंग, रिमोट हॉल्टर मॉनिटरींग, पूर्ण सुसज्ज कार्डियाक आयसीयू, २४ तास अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी सुविधांसह रक्तवाहिन्यांच्या इतर आजारांवर उपलब्ध सेवा व सुविधांची माहिती उपस्थितांना दिली.
मान्यवरांच्या मनोगतामध्ये बोलतांना केशवस्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष भरतदादा अमळकर म्हणाले की, शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी लाठी परिवाराने पूर्णतः विचार करुन या हॉस्पिटलची इमारत बांधली आहे. अद्ययावत सुविधा देण्यासोबतच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचाही विचार करुन बांधलेली ही इमारत रुग्णालयाच्या वास्तूचा एक उत्तम नमूना आहे.
त्यानंतर बोलतांना पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम यांनी नागरिकांच्या सुविधा देण्यासोबतच विविध आजारांवर एकाच छताखाली उपचार करणाऱ्या या आरोग्यमंदिराने वैद्यकिय सेवेचा आदर्श निर्माण करण्यासोबतच, यापुढे अधिकाधिक उपचारांवर उत्तम सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण सोमाणी यांनी मानले.