जळगाव (जिमाका) – समाज कल्याण सहायक आयुक्त व आय. आर. जी. केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्तींचा सहभाग होता. मतदार जनजागृतीसाठी उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींच्या माध्यमातून ‘माझे मत – माझे भविष्य, मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी – मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा -मतदानच आहे उद्याची आशा’ अशा विविध घोषणांच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्यात आली.
अॅड. भारती भालेराव, समाज कल्याण तालुका समन्वयक जितेंद्र धनगर, महेंद्र पाटील, तृतीयपंथीय प्रतिनिधी भरत जोगी यांनी तृतीयपंथीयांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली. तृतीयपंथीय समुदायामध्ये आप-आपल्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नव्याने मतदान नोंदणी करणे, मतदानाप्रती तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये उत्साह निर्माण होणे बाबत उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आवाहन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय समुदायाला लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली. वय वर्ष १८ पूर्ण केलेल्या भावी मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक व आर.जी.केअर सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले.