जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे शनिवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्ह्यातील तिघी मंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये उद्घाटन होणार आहे. यानंतर दिवसभरात आरोग्य क्षेत्रातील विविध वर्गांचे मणक्याचे आजार याविषयी प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन, निरामय सेवा फाउंडेशन, आणि जी.एम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे निर्माण करण्यात आले आहे. या शस्त्रक्रियागृहामुळे रुग्णांना अनन्यसाधारण फायदा होणार आहे.
अत्यंत गुंतागुंतीची आणि मोठ्या स्वरूपातील शस्त्रक्रिया या शस्त्रक्रिया गृहांमध्ये करता येणार आहे. या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण झालेले असून रुग्णसेवेसाठी हा विभाग सज्ज झाला आहे. या विभागाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन कार्यमंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होत आहे.
शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा नियोजन भवनामध्ये पुढील प्रशिक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटना वेळी सर्व मंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानंतर दुपारी साडेबारा वाजता आशा व अंगणवाडी सेविका यांचे आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अस्थिव्यंगोपचार फाउंडेशन, फिजिओथेरपी फाउंडेशन यांच्या सदस्यांना मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये मणक्याचे आजार, त्यांची लक्षणे त्यांचे निदान कसे करावे, उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया संदर्भामध्ये सविस्तर माहिती डॉ. भोजराज हे देणार आहेत.
रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.