जळगाव – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व ‘फेशर्स डे’ साजरा केला.
अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा सुरू केली. सोळा वर्षापासून सुरू असलेल्या अनुभूती स्कूल च्या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘फेशर्स डे’ साजरा केला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत सौ. ज्योती जैन, सौ.शोभना जैन, डाॕ. भावना अतुल जैन, सौ. अंबिका अथांग जैन, प्राचार्य देबासिस दास यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरक संवाद साधला. अनुभूती स्कूल हे एक कुटुंब असून येथे फक्त अभ्यास महत्त्वाचा नाही, तर आपल्या कलागुणांमध्ये निपूण होण्याची संधी मिळते. कला, साहित्य, स्पोर्टस यासह सांस्कृतिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच उद्देश अनुभूती स्कूलचा असल्याचे अतुल जैन म्हणाले. प्राचार्य देबासिस दास यांनी अनुभूती स्कूलच्या विकासात्मक वाटचालीबाबत सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला नृत्यासह गणेश वंदना विद्यार्थ्यांनी सादर केली. सारे जहाँ से अच्छा हे देशभक्तीपर गीत, लकडी की काठी, हरे क्रिष्णा हरे रामा अशा एकाहून एक गीतांसह मेमिक्री, भांगडा नृत्य, तबला वादन, मानवतेचा संदेश देणारे ‘हिच आमची प्रार्थना’, केदारनाथ व ईच्छा पूर्ती एकांकिका अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. सोशल मीडीयाचा प्रभाव या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिकेतून प्रबोधन केले. 5 व 6 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले महादानी नाटक विशेष ठरले. ‘फुलो ने मिट्टीसे पुछा..’ हे पर्यावरण गीत सादर केले. राजस्थानच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला.
दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली.
आभार प्रमोद कांबळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले.