जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागामध्ये एका २२ वर्षीय विवाहितेची सिजर प्रसूती झाली. मात्र मात्र हे गर्भ अविकसित होते. तसेच ते एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत व्यंगात्मक पद्धतीने सयामी जुळे होते. ते काही क्षणांनी मृत्यू झाले. त्यामुळे तात्काळ सिजर प्रसुती करून महिलेला दिलासा देण्यात आला. ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात यशस्वी झाल्याने अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केलं आहे.
एरंडोल तालुक्यातील २२ वर्षे विवाहिता ही गरोदर असल्याने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आली होती. तेथे तिची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटामध्ये पाच महिन्याचा अविकसित गर्भ त्यातही दोन बाळे सयामी, एकमेकांना जुळलेली अशा व्यंगात्मक परिस्थितीत सोनोग्राफीमध्ये आढळून आली. त्यामुळे स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांनी तात्काळ दिला दाखल करण्याचा निर्णय घेतला.तिच्या शरीरात ६ हिमोग्लोबिन एवढेच रक्त होते. दोन थैल्या रक्त चढवल्यानंतर अविकसित गर्भ बाहेर काढण्यासाठी सिजर प्रसूती करण्यात आली. प्रसुती दरम्यान सदर महिलेच्या पोटातून एकमेकांना जुळलेले व्यंगात्मक पद्धतीचे सयामी जुळे असलेले दोन बाळ वैद्यकीय पथकाने बाहेर काढले. मात्र काही क्षणातच ते दगावले.
त्यानंतर महिलेवर औषधोपचार करून प्रकृती आता स्थिर आहे. महिलेला दिलासा देण्याकामी स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. संजय बनसोडे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. राहुल कातकाडे, डॉ. विनेश पावरा, डॉ. रणजीत पावरा, डॉ. अमृता दुधेकर, डॉ. पूजा बुजाडे, डॉ. पूजा वाघमारे यांच्यासह इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या स्टाफने परिश्रम घेतले. सदरहू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल तसेच रुग्णाला दिलासा दिल्यामुळे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
वेळोवेळी सोनोग्राफी आवश्यक
“सदर महिलेची सिजर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. महिलेला सयामी जुळे झाले होते. मात्र व्यंगात्मक असल्यामुळे हे सयामी जुळे काही क्षणातच मृत झाले. ग्रामीण भागातील बहुतांश महिला या सोनोग्राफी वेळेवरती करीत नाहीत. तसेच बिजांड फलित होण्याचे विघटन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अशा पद्धतीचे व्यंगात्मक गर्भ तयार होतात. त्यामुळे गरोदरपणामध्ये खूप काळजी घेऊन सोनोग्राफीदेखील वेळोवेळी केले पाहिजे.
-डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्राध्यापक, जीएमसी, जळगाव.
मृतांचे शव अभ्यासासाठी
रुग्णालयात सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ही दुर्मिळ घटना आहे. सदरहू मृत बाळांचे शव हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागांमध्ये ठेवण्यात येत आहे.
– डॉ. गिरीश ठाकूर
अधिष्ठाता, जी.एम.सी., जळगाव