जळगाव – येथील जळगाव तालुका कृषक सहकारी क्रय विक्रय संघाच्या चेअरमनपदी आज माजी उपमहापौर तथा भाजपाचे नगरसेवक सुनिल वामनराव खडके यांची तर व्हाईस चेअरमनपदी आवार येथील महेंद्र दयाराम चौधरी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी एम.पी. भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत निवडणूक प्रक्रीया पार पडली. श्री. खडके यांच्या उमेदवारी अर्जावर महेंद्र चौधरी सूचक तर निळकंठ नारखेडे हे अनुमोदक होते, तर महेंद्र चौधरी यांच्या अर्जासाठी जगन्ना्थ खडके हे सूचक तर गणपत पाटील अनुमोदक होते.
जळगाव तालुका स्तरावरील महत्वाच्या अशा या संस्थेत गेल्या ३५ वर्षांपासून माजी नगराध्यक्ष वामनराव खडके यांच्या नेतृत्वाची सत्ता अबाधिक आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीतदेखील त्यांच्याच नेतृत्वात सर्व उमेदवारांची निवड झाली होती. नवनिर्वाचित चेअरमन सुनिल खडके हे जळगाव शहराचे माजी उपमहापौर असून येथील शहर विविध कार्यकारी संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत.
आज चेअरमनपदाच्या निवडणुकीत नवीन पिढीकडे संस्थेची सूत्रे गेल्याचे दिसते. बैठकीस संचालक वामनराव पंडित खडके, दुर्गादास दामू भोळे, गणपत सोमा पाटील, जितेंद्र मधुकर पाटील, जगन्नाथ गलु खडसे, प्रभाकर काशिनाथ पाटील, नीळकंठ आनंदा नारखेडे, गलू नामदेव काळे, चंदन सुरेश महाजन, पुष्पा भागवत ढाके , मिनाक्षी हेमराज पाटील, रामदास हजारी घेगट व अविनाश वसंत भालेराव उपस्थित होते.