जळगाव – महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या. दि.७ एप्रिल २०२३ रोजी, जैन हिल्स येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला उद्युक्त होईल अशा बुद्धिबळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिंचा सन्मान करण्यासाठी ‘महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन’ दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. बुद्धिबळ प्रसाराल नाविन्याची जोड देणाऱ्या मंदार वेलणकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार सोहळा होत असतो. याची सुरवात २०१७ पासून झाली आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संदीप गोहाड, संजय आढाव, राघव पठाडे यांच्या समितीने सदर पुरस्कार अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांना देण्याचे जाहीर केले. स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य असलेल्या श्री. अशोक जैन यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आपल्या कुशल नेतृत्त्वाने महाराष्ट्रातील बुद्धिबळ क्षेत्राला एक वेगळी झळाळी मिळवून दिली. त्यामुळे हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
जैन हिल्स येथे शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी, सकाळी १०.०० वाजता हा पुरस्कार महाराष्ट्राचे प्रथम ग्रँड मास्टर श्री. अभिजित कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री नंदलाल गादिया यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.