जळगाव – दोन महिन्यांपूर्वी एरंडोल तालुक्यातील ज्या जवखेडा गावात वीजचोरी पकडणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती; त्याच गावामध्ये मंगळवारी वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली, या मोहिमेमध्ये गावातील सर्व वीज कनेक्शनची तपासणी करण्यात आले. यामध्ये एकूण 51 घरांमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. याप्रसंगी पोलिस बंदोबस्तदेखील सोबत घेण्यात आला.
ही मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल उपविभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी राबविली. यात एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता पी.एस. महाजन, कासोदा कक्षाचे सहायक अभियंता राहुल पाटील, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, पिंपळकोठा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील यांच्यासह सर्व जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या मोहिमेत वीजचोरी पकडण्यासोबतच गावातील जुन्या वीजतारा काढून नवीन एरियल बंच केबल टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. काही भागातील काम झाले असून उर्वरित काम येत्या २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे या गावातील तसेच परिसरातील वीजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.