जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमात बदनामी केल्याचा प्रकार जळगावात १४ मे रोजी उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अंकीत प्रल्हाद पाटील व हरीष कोळी (दोघांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांनी स्वत:च्या समाजमाध्यमाच्या अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध केला आहे. हा प्रकार लक्षात येताच लाडवंजारी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितांच्या समाजमाध्यमावरील खात्याची तांत्रिक माहिती काढली आहे.
केतकी चितळेचे सर्व अकाऊंट ब्लॉक करा
अभिनेत्री केतकी चितळे, अडॅ. नितीन भावे यांनी देखील समाजमाध्यमातून पोस्ट करुन खासदार शरद पवार यांची बदनामी केली आहे. केतकी हिने वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचे समाजमाध्यमावरील सर्व अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करावे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात ती अशाप्रकारचे कृत्य करणार नाही. तिचे मानसिक संतुलन तपासून घ्यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिले आहे.