जळगाव- आज सकाळी शहरातील भाजपा कार्यालयात मध्यरात्री माथेफिरू एकाने कचरा आणून दरवाजाजवळ जाळपोळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठेतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माथेफिरू विजय श्रीराम पवार (वय-४३ रा. मामलेदार केचरीजवळ बळीराम पेठ) याने कचरा आणि टायर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उजव्या बाजूला असलेल्या खोलीच्या बंद असलेल्या लाकडी दरवाजा जवळ टाकले, आगपेटीने तो कचरा पेटवून दिला. यात दरवाजा अर्धवट जळाला आहे.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास भाजपा कार्यालयातील कार्यालयीन कम्रचारी गणेश माळी कार्यालय उघडण्यासाठी आला असता प्रकार लक्षात आला. त्यावेळी अर्धवट जळालेल्या दरवाजातून धुर निघत होता. गणेश माळी यांनी तत्काळ प्रकाश भगवानदास पंडीत यांना माहिती दिली. सकाळी कार्यालयीन कर्मचारी यांनी पाण्याने ही आग विझविली.
दरम्यान, भाजपा कार्यालयीन कर्मचारी प्रकाश भगवान पंडीत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती यापुर्वी या कार्यालयात काम करणारा विजय श्रीराम पवार असल्याचे समोर आले. विजय पवार हा मनोरूग्ण आल्याने त्याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी वैद्यकिय तपासणीसाठी रवाना करण्यात आले.