मुंबई वृत्तसंस्था – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा, 21 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील 19 केंद्रांवर सुरू होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज केली.
ओमायक्रॉन आणि कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, 15 जानेवारी पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली गेली होती. सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरुवात 21 फेब्रुवारी पासून, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा 5 मार्च पासून तर बालनाट्य स्पर्धा 10 मार्च आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.
या निमित्ताने सहभागी स्पर्धक संघ व कलाकारांचे अभिनंदन करून सर्व सहभागी संघांनी कोवीड-19 विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे