जळगाव, प्रतिनिधी । प्रभाग क्र. 12 मधील विकास कामांचे फलक फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, ह्याबाबतचे निवेदन युवा सेना जळगाव महानगरतर्फे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रभर विकास कामे झपाट्याने करीत आहे. जळगाव शहरात सुद्धा राज्यसरकारचे नगरविकास मंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जळगाव शहरातील विविध प्रभागात विकास कामे सुरू आहेत. सदर विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने प्रभाग क्र. 12 मधील शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते अनंत जोशी व ज्येष्ठ नगरसेवक नितीनजी बरडे यांनी फ्लेक्स चे फलक विविध ठिकाणी लावले होते. सदर बॅनरवर मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचे फोटोसुद्धा होते. यासह शहरातील शिवसेना पदाधिकारी तसेच मनपातील शिवसेनेचे नेते यांचेही फोटो होते. काही समाजकंटकांनी सदर बॅनर्सची नासधूस करून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर समाजकंटकांमुळे समाजातील विविध राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता दिसून येते. असा गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अश्या विषयाचे निवेदन युवा सेना जळगाव महानगर तर्फे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले.
जिल्ह्याला विकास हवा आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद तसेच वर्षभरात महानगरपालिकेची निवडणूक आहे. या सर्व निवडणूकींच्या तोंडावर असे प्रकार ठरवून केल्याचे दिसून येत आहे. अशा समाजकंटकांवर त्वरीत कारवाई झाल्यास भविष्यात इतर गेरप्रकार करणाऱ्यांवर वचक बसविण्यास मदत मिळेल. अन्यथा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
यावेळी युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर युवाधिकारी गिरीष सपकाळे, यश सपकाळे, महानगर समन्वयक संकेत कापसे, विभाग प्रमुख तेजस दुसाने, अमोल मोरे, युवती उपशहर युवाधिकारी वैष्णवी खैरनार, युवासैनिक अमित जगताप आदी उपस्थित होते.